जळगाव समाचार | २९ मार्च २०२६
रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग–२०२६ (JCL T-20 पर्व-२)’ साठी फ्रँचायझी व आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये उत्साहात पार पडले. या ऑक्शनमध्ये संघ मालक, प्रशिक्षक व आयकॉन खेळाडूंची निवड करण्यात आली असून, स्पर्धेच्या तयारीला वेग आला आहे.
या ऑक्शनमध्ये जळगाव किंग्स या संघासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. अखेरीस ही फ्रँचायझी दाल परिवार तसेच प्रेम कोगटा व अतुल कोगटा यांनी मिळवली. त्यानंतर झालेल्या आयकॉन खेळाडूंच्या बोली प्रक्रियेत ओम मुंडे हा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला असून, त्याला सागर पार्क क्रिकेट क्लबच्या चाळीसगाव चार्जर्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले. या प्रक्रियेत प्रत्येक संघाने आपल्या संघबांधणीसाठी प्रशिक्षक व आयकॉन खेळाडूंवर रणनीतीपूर्वक बोली लावली.
या लीगमध्ये जळगाव किंग्स, चाळीसगाव चार्जर्स, रावेर रॉयल्स, अमळनेर जायंट्स, जामनेर ब्लास्टर्स आणि पाचोरा टायटन्स हे सहा संघ निश्चित झाले आहेत. जळगाव किंग्स संघाचे प्रशिक्षक घनश्याम चौधरी असून आयकॉन खेळाडू म्हणून जगदीश झोपे यांची निवड झाली आहे. चाळीसगाव चार्जर्स संघासाठी प्रशिक्षक सचिन सोनवणे असून आयकॉन खेळाडू म्हणून ओम मुंडे यांचा समावेश आहे. रावेर रॉयल्स संघाचे मालक सीए महावीर जैन असून प्रशिक्षक तनवीर अहमद आणि आयकॉन खेळाडू नचिकेत ठाकूर आहेत.
अमळनेर जायंट्स संघासाठी सुहांस केमिकल्सचे संदीप काबरा हे मालक असून प्रशिक्षक राहुल निंभोरे आणि आयकॉन खेळाडू शुभम शर्मा आहेत. पाचोरा टायटन्स संघासाठी एस.के. ट्रान्सलाइनचे हेमंत कोठारी मालक असून प्रशिक्षक पंकज महाजन व आयकॉन खेळाडू सचिन चौधरी यांची निवड झाली आहे. जामनेर ब्लास्टर्स संघाचे मालक रमेशदादा जैन असून प्रशिक्षक मुश्ताक अली आणि आयकॉन खेळाडू शतायू कुलकर्णी यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविक करत स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. या वेळी उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, युसूफ मकरा, खजिनदार राजेंद्र लढ्ढा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ऑक्शन प्रक्रियेदरम्यान अतुल जैन, राजेंद्र लढ्ढा, अरविंद देशपांडे, मुख्य पंच संदीप गांगुर्डे आणि हितेश पटेल यांनी आयकॉन खेळाडूंची निवड व ड्रॉ प्रक्रिया पार पाडली. अॅड. सूरज जहांगिर यांनी सूत्रसंचालन केले, तर अरविंद देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना उच्च दर्जाच्या सामन्यांचा आनंद घेता येणार असून स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

![]()




