“आईलाच असते घराची काळजी; घरासारखं जळगावचा संभाळ करेल” – जयश्रीताई महाजन यांचा भावनिक साद


जळगाव समचार डेस्क | १३ नोव्हेंबर २०२४

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचारार्थ काल दि १२ नोव्हेंबर रोजी दुपारी रामानंद नगर पोलिस स्टेशन परिसरात काढलेल्या प्रचार रॅलीने वातावरण अधिकच भावनावेधक बनवले. जयश्री महाजन यांच्या बोलण्यातून आणि नागरिकांसोबतच्या संवादातून त्यांचे शहराप्रती असलेले प्रेम, कृतज्ञता आणि निस्सीम बांधिलकी दिसून आली.

रॅलीदरम्यान जयश्रीताईंनी मायेचा साद घालताना जळगावकरांच्या मनात एक विशेष जागा निर्माण केली. “आईला आपल्या घराची काळजी असते, ती थकत नाही, ती कधीच मागे हटत नाही, कारण तिला माहित असतं की तिच्या कष्टांनी तिचं घर सुरक्षित राहील. जळगाव हे घर सांभाळण्याची जबाबदारी मी माझ्या मायेने आणि न थकता पार पाडीन. शहराला घडवण्याचं काम मी एक आई म्हणून करेन,” असे त्या भावूकपणे म्हणाल्या.

रॅलीदरम्यान महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. जयश्री महाजन यांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक घराजवळ भगिनी मोठ्या उत्साहाने उभ्या होत्या. “ताई, तुमच्यासारखी माणसं आमच्यासोबत आहेत, याचीच आम्हाला खात्री आहे,” असे भावनिक उद्गार काही महिलांनी व्यक्त केले. महिलांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, अक्षता ओवाळून त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

महाविकास आघाडीच्या नेत्यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदवला. जयश्री महाजन यांच्या भावनिक संवादाने आणि जळगावप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदारीने जनमानसाला एक नवी उभारी दिली आहे.

“जळगावच्या प्रत्येक कोपऱ्याचा मी सांभाळ करेन, प्रत्येकाच्या घराची एक जबाबदार माणूस म्हणून कर्तव्य पार पाडेन,” असा दृढनिश्चय जयश्री महाजन यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here