जळगाव समाचार | २० मे २०२५
प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानलेखक आणि आयुका (IUCAA) संस्थेचे संस्थापक प्रा. जयंत नारळीकर यांचे आज (२० मे) पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. पहाटे झोपेतच त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला.
प्रा. नारळीकर हे केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले आणि सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. त्यांच्या संशोधनातून ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ निर्माण झाला, ज्यामुळे त्यांना जागतिक मान्यता मिळाली.
१९७२ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आवाहनावरून ते भारतात परतले आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत राहिले. पुढे त्यांनी पुण्यात ‘आयुका’ची स्थापना केली, जे आज भारतातील अग्रगण्य खगोलशास्त्र संस्थांपैकी एक आहे.
डॉ. नारळीकर हे विज्ञानाचे लोकप्रियकरण करणारे मोठे साहित्यिकही होते. त्यांनी मराठीतून विज्ञानकथा, कादंबऱ्या, लेख आणि आत्मचरित्र लिहिले. त्यांच्या ‘अंतराळातील भस्मासुर’, ‘टाइम मशीनची किमया’, ‘यक्षांची देणगी’ अशा कथांनी अनेक वाचकांच्या मनात विज्ञानाची गोडी निर्माण केली.
त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मविभूषण (२००४), महाराष्ट्र भूषण (२०१०), साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४) यांसारखे सन्मान मिळाले.
त्यांचा १९ जुलै हा जन्मदिवस ‘विज्ञानकथा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तसेच, २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.
डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे विज्ञान, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा सदैव स्मरणात राहील.