जळगाव समाचार | १० जून २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट आज (१० जून) २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. या निमित्ताने पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचा मेळावा बालगंधर्व रंगमंदिरात पार पडत आहे. या मेळाव्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वाचं आणि भावनिक वक्तव्य केलं आहे.
जयंत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. “मला शरद पवार साहेबांनी खूप संधी दिल्या आहेत. गेली सात वर्षं त्यांनी मला पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. आता पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे. त्यामुळे मी सर्वांसमोर साहेबांना विनंती करतो की त्यांनी मला या जबाबदारीतून मुक्त करावं. हा पक्ष साहेबांचा आहे. शेवटी निर्णय तेच घेतील,” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पक्षात नेतृत्वबदल होणार का, नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असतील, याबाबत चर्चेला उधाण आलं आहे. जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत असून, पक्षाच्या विविध संकटांमध्ये त्यांनी संयमी भूमिका बजावली आहे.
या मेळाव्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार आणि खासदार उपस्थित होते. जयंत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याच्या शेवटी शरद पवारांसह सर्व सहकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. “आपल्याला अजून बरंच पुढे जायचं आहे,” असं सांगत त्यांनी पक्षाच्या भविष्यकाळाबाबत आशावाद व्यक्त केला.
जयंत पाटील यांच्या या भावनिक आणि स्पष्ट सूचनेनंतर आता शरद पवार काय निर्णय घेणार, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे कोणाकडे सोपवली जाणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

![]()




