जळगावात बुधवारी पक्षविरहीत शेतकरी जनआक्रोश मोर्चा केळी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सरकारच्या निदर्शनास आणून देणार

जळगाव समाचार | १६ सप्टेंबर २०२५

नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी निघालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातही शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि ठाकरे गटाच्या पाठबळाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा पक्षविरहीत मोर्चा काढला जाणार असून, जिल्ह्यातील केळी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू हेही उपस्थित राहणार आहेत.

नाशिक येथे निघालेल्या मोर्चात जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. गेल्या काही वर्षांपासून केळी आणि कापूस उत्पादक शेतकरी गंभीर संकटात सापडले असून, उत्पादन खर्चही भागवणे कठीण झाले आहे. बाजारात योग्य भाव मिळत नाही, त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळांमुळे उभी पिके नष्ट होत आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे.

शेतकऱ्यांना पीकविमा योजना आधार देईल अशी अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात विमा कंपन्या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवत असल्याची तक्रार वाढत आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारल्याने प्रत्यक्ष परिस्थितीचे अचूक चित्र समोर येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तरी भरपाई मिळत नाही. दोष हवामान केंद्राचा असला तरी त्याचा फटका मात्र शेतकऱ्यांनाच बसत आहे.

शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत उन्मेष पाटील यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. “शेतकरी जगण्यासाठी झगडत आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर रस्त्यावर उतरणे भाग पडेल. हा मोर्चा म्हणजे सरकारला दिलेला इशारा आहे,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.

या मोर्चातून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवावे आणि हवामान केंद्रातील त्रुटी दूर कराव्यात, अशा मागण्या करण्यात येणार आहेत. पक्षविरहीत असलेल्या या आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा प्रचार नसेल, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

जळगावमध्ये दोन वर्षांपूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी कापसाला १२ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, या मागणीसाठी जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी ट्रॅक्टर व बैलगाड्यांसह सहभागी झाले होते.

याशिवाय, ठाकरे गटानेही गेल्या महिन्यात जळगाव येथे जनआक्रोश मोर्चा काढून महायुती सरकारच्या धोरणांचा निषेध करत प्रतिकात्मक तिरडी जाळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी मनाई केली तरी आंदोलक मागे हटले नव्हते. त्या वेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेतील चर्चेदरम्यान रमी खेळताना आढळल्याचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल झाला होता. मात्र सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता खाते बदलून वेळ मारून नेली होती.

जळगावमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रोश व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चात सहभाग नोंदवला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here