जळगाव समाचार | २२ नोव्हेंबर २०२५
जिल्ह्यातील १६ नगर परिषद आणि दोन नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये महायुतीचे तिन्ही घटकपक्ष एकत्र येण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून, अनेक ठिकाणी भाजप एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी दोंडाईचा नगर परिषदेप्रमाणे येथेही सर्व विरोधी उमेदवारांना माघारीसाठी प्रवृत्त करून बिनविरोध नगराध्यक्ष निवड घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्नी साधना महाजन यांच्यासाठी हा मार्ग मोकळा झाला खरा; मात्र नगरसेवक पदांवरील सर्व जागा बिनविरोध काढण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला.
जामनेर नगरसेवकपदाच्या १३ प्रभागांतील २६ जागांसाठी ९१ अर्ज वैध ठरल्यानंतर तीन दिवसांत ३३ उमेदवारांनी माघार घेतली आणि भाजपच्या नऊ जागा बिनविरोध निश्चित झाल्या. शेवटच्या क्षणी दोन विरोधी उमेदवारांना माघारीसाठी आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे दोघेही माघार न घेता ठाम राहिले. त्यामुळे भाजपला अपेक्षित असलेला ‘सर्व जागा बिनविरोध’ हा महाजनांचा प्रयोग अर्धवट ठरला आणि त्यांचे प्रयत्न निष्फळ झाले.
दरम्यान, माघारीच्या अंतिम मुदतीपूर्वी विरोधी उमेदवारांना दबाव, धाक दाखवून आणि बळजबरीने माघार घ्यायला लावल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटासह विरोधकांनी केला असून या प्रकरणाची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. पैशांच्या जोरावर लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोपही त्यांनी भाजपवर ठेवला. मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, “भाजपने कोणावरही दबाव टाकलेला नाही; विरोधकांचा हा केवळ राजकीय कांगावा आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

![]()




