जळगाव समाचार | १६ सप्टेंबर २०२५
जामनेर तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर संततधार व ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक गावांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नेरी, सूनसगावसह आसपासच्या भागांत पाणी मोठ्या प्रमाणावर घुसल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकी नाल्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने जळगाव-जामनेर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून, वाहनचालक व प्रवाशांची परवड झाली आहे.
पावसामुळे कांग नदीलाही जोरदार पुराचा फटका बसला असून नेरी बु गावात प्रचंड नुकसान झाले असून, अनेक बकऱ्यांचाही यामध्ये मृत्यू झाल्या आहे. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेतांमध्ये उभ्या असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. काही भागांमध्ये घरांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली असून आपत्तीग्रस्तांसाठी मदत कार्य हाती घेण्यात आले आहे.
पावसामुळे जामनेर शहरातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बचाव व मदत कार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तालुक्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासन सतर्कतेने कार्यरत आहे.