जळगाव समाचार डेस्क;
दि ११ जानेवारी रोजी जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावात घडलेल्या घटनेतील आरोपीला काल भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले. या नराधमाने अत्यंत अमानुषपणे सहा वर्षीय मुलीचा अत्याचार व खून ( Rape And Murder) केला होता आणि त्यानंतर तो फरार होता. (Crime) सुभाष उमाजी भील (३५) या आरोपीला पकडण्यात आले आहे. आरोपीला अटक केल्याची माहिती मिळताच रात्री उशिरा जमावाने एकच गोंधळ घातला. मोठ्या संख्येने लोकांनी पोलिस ठाण्यावर हल्ला केला आणि आरोपीना जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी सुरू केली. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करत जामनेर पोलिस ठाण्याची तोडफोडही केली. यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलिस जखमी झाले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावात सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा खून करणारा आरोपी सुभाष इमाजी भिल (35), रा. चिंचखेडा ता. जामनेर या फरार आरोपीला अटक झाल्याचे वृत्त पसरताच जामनेर शहरात मोठी गर्दी झाली. आरोपींना जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी करत लोकांनी रास्ता रोको करत पोलीस ठाण्याला घेराव घातला. मागणी मान्य न केल्याने पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. रात्री अकराच्या सुमारास पोलीस अधीक्षक आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
जमावाने पोलीस ठाण्यात गोंधळ घातला
दहा दिवसांपूर्वी जामनेर येथे एका सहा वर्षीय मुलीची आरोपीने निर्घृण हत्या केली होती. ही घटना घडवून आणणारा गुन्हेगार घटनास्थळावरून फरार झाला होता. २० जून रोजी भुसावळ येथील तापी नदीजवळ पोलिसांनी त्याला अटक केली होती. गुन्हेगाराच्या अटकेचे वृत्त समजताच शहरात सर्वत्र पसरली. पोलिस स्टेशनवर जमाव जमला. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव पोलिस ठाण्यात घुसला.
इन्स्पेक्टरसह अनेक पोलीस जखमी
जमावाने दगडफेक करत पोलीस ठाण्याची तोडफोड केली. यानंतर पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. काही नागरिकही जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर दंगल नियंत्रण पथके जामनेर शहरात रवाना झाली आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये म्हणून पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे स्वतः जामनेरात दाखल झाले. जमावाला समजवण्यासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरले.
या दगडफेकीत रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यापैकी रामदास कुंभार, रमेश कुमावत गंभीर जखमी आहेत. तसेच जखमी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.