संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद – ॲड.निलम शिर्के सामंत बालरंगभूमी परिषदेच्या जल्लोष लोककलेचा महोत्सवाचा उद्‌घाटन सोहळा संपन्न

जळगाव समाचार | २९ नोव्हेंबर २०२५

कोरोना काळात मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या बालकांना डिजिटल व्यसनापासून दूर ठेवत, त्यांच्या मनावर संस्कारांची पेरणी करताना कलाभान जोपासण्याचे महत्त्वाचे कार्य बालरंगभूमी परिषद करत असल्याचे प्रतिपादन परिषदच्या मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत यांनी केले. ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

जळगाव जिल्हा शाखेतर्फे आयोजित हा महोत्सव २८ व २९ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि लोककलांचा वारसा बालकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोककलांचा अभ्यास आणि आनंद यांची सांगड घालणे हा महोत्सवाचा मुख्य हेतू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. निलम शिर्के सामंत, प्रभारी प्रमुख कार्यवाह व जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, ज्येष्ठ लोककलावंत जयश्रीताई पाटील, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, उपाध्यक्ष नेहा पवार, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह समूह लोकनृत्य स्पर्धेचे परीक्षक डॉ. सुचित्रा लोंढे व सचिन भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले. यावेळी बोलताना ॲड. सामंत यांनी बालरंगभूमी परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती देत पालकांनी परिषदेला सहकार्य करावे आणि बालकांनी बालप्रेक्षक म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन केले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पार पडलेल्या समूह लोकनृत्य सादरीकरणात जिल्ह्यातील २४ शाळांतील २८० बालकलावंतांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन योगेश शुक्ल यांनी केले.

महोत्सव यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष अमोल ठाकूर, आकाश बाविस्कर, मोहित पाटील, सुदर्शन पाटील, पंकज बारी, हर्षल पवार आदी पदाधिका-यांसह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here