जळगाव समाचार डेस्क | १७ सप्टेंबर २०२४
बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे लोककलांची माहिती व महती लहान मुलांमुलींपर्यंत पोहचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ हा महोत्सव राबविण्यात येत आहे. जळगाव शहरात या महोत्सवाचे आयोजन दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे. हा महोत्सव सादरीकरणासोबतच स्पर्धात्मक महोत्सव असून, दि. २१ सप्टेंबर रोजी या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या बालकलावंताकरिता तब्बल ७५ हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाच्या जळगाव येथील आयोजनात भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अनमोल सहकार्य बालरंगभूमी परिषदेस लाभत आहे.
बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे दि. २१ रोजी एकल स्पर्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक सभागृह महाबळ रोड जळगाव येथे तर सांघिक स्पर्धा दि. २२ रोजी ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सकाळी नऊ वाजता होणार आहेत. या महोत्सवात वय ६ ते १५ या वयोगटातील बालकलावंतांसाठी लोककला या प्रकारातील समूह नृत्य, समूह गायन, एकल गायन, एकल नृत्य व एकल वादन अशा स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नसून, स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
समूह नृत्य आणि समूह गीत स्पर्धेकरिता सर्वोत्कृष्ट रु.११ हजार रोख व स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट रु.७ हजार रोख व स्मृतिचिन्ह, उत्तम रु.५ हजार रोख व स्मृतिचिन्ह तसेच प्रशंसनीय ठरणाऱ्या दोन समूह नृत्य व समूह गीतांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. एकल नृत्य / वाद्य वादन/ गायन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बालकलावंतांना सर्वोत्कृष्ट ३००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट २ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, उत्तम १ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह तर प्रशंसनीय ठरणाऱ्या दोन कलावंतांना पाचशे रुपये रोख व स्मृतिचिन्ह पारितोषिक स्वरुपात देण्यात येणार आहे.
बालरंगभूमी परिषदेने आयोजित केलेल्या ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात जास्तीत जास्त शाळा, विद्यालयांनी तसेच बालकलावंतांनी सहभागी व्हावे असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाहक विनोद ढगे, उपाध्यक्ष हनुमान सुरवसे, अमोल ठाकूर, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, प्रवक्ता आकाश बाविस्कर, हर्षल पवार, सोशल मिडीया समितीप्रमुख मोहित पाटील, कार्यकारिणी सदस्य दिपक महाजन, पंकज बारी, सुदर्शन पाटील, दर्शन गुजराथी, नेहा पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, उल्हास ठाकरे यांनी केले आहे.
व्हिडीओ लिंक
इंस्टाग्राम
फेसबुक
https://www.facebook.com/share/r/VpBAsc1DhY9HJYvL/?mibextid=Mk4v2M
जल्लोष लोककलेचा महोत्सवात सहभागी होण्यासाठी सचिन महाजन +91 76209 33294, मोहित पाटील +91 90673 04797 या क्रमांकावर संपर्क साधावा