जळगाव समाचार | १४ मार्च २०२५
धान्याने भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रेल्वेगेट तोडून रेल्वेमार्गात घुसला आणि मुंबई-अमरावती एक्सप्रेसच्या (क्र. १२१११) इंजिनवर धडकला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता बोदवड रेल्वेस्थानकापासून ५०० मीटर अंतरावर घडली.
अपघाताच्या वेळी एक्सप्रेस गाडीची गती कमी होती. चालकाने तत्काळ ब्रेक लावल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, धडकेमुळे गाडीत झोपलेले काही प्रवासी बर्थवरून खाली पडले. ट्रक धडकल्यावर चालकाने उडी घेतली आणि तो घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे काही काळ रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती.