शिंदे गटात मोठी खळबळ! निलेश पाटलांचा अचानक राजीनामा; अजित पवार गटात प्रवेशाची जोरदार चर्चा

 

जळगाव समाचार | १५ नोव्हेंबर २०२५

जळगावच्या राजकारणात एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडींनी तापमान चढले आहे. शहरातील शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर विष्णु भंगाळे यांच्यावर ‘घोटाळे केल्याचे’ आरोप करत पीयूष पाटील यांनी केलेल्या धमाकेदार टीकेने वातावरण आधीच चांगलेच ढवळून निघाले होते. त्यात आता शिंदे गटाला दुसरा मोठा धक्का बसला आहे—माजी जिल्हाप्रमुख आणि सध्याचे सहसंपर्क प्रमुख निलेश पाटील यांनी पक्षाला दिलेला अचानक राजीनामा. ठाकरे गटातून शिंदे गटात आल्यावर भंगाळे यांना थेट जिल्हाप्रमुख केल्यापासून नाराज असलेले पाटील अखेर पक्षातून बाहेर पडल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच महायुतीतील भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांच्यातील आतील मतभेद उफाळून वर येऊ लागले आहेत. एका बाजूला तीनही पक्ष स्वबळाचा नारा देत मोठमोठे प्रवेश घडवून आणत आहेत, तर दुसऱ्या बाजूला एकमेकांची माणसे पळवण्याचा खेळ सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भाजपात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील प्रवेशांवर मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना “कुणालाही, कशाही परिस्थितीत पक्षात घ्या” असा दिलेला खुला सल्ला विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

महायुतीने विधानसभेनंतर ‘दुसऱ्या पक्षातून येणाऱ्यांची काटेकोर चाळणी’ करण्याचा घेतलेला निर्णय आता फोल ठरताना दिसतो आहे. अजित पवार गटाने सुरुवातीला विरोधकांचे स्वागत सुरू केले, त्यानंतर भाजपाने, आणि आता शिंदे गटानेही महायुतीविरोधात लढलेल्यांनाही प्रवेश देत परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची केली आहे. पाचोरा आणि अमळनेर येथे एकमेकांच्या विरोधकांना सामील करून घेतल्याने भाजप व शिंदे गटातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, आगामी सत्तासमीकरणांवर याचा थेट परिणाम होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

याच पार्श्वभूमीवर निलेश पाटील यांचा स्फोटक राजीनामा शिंदे गटासाठी मोठा राजकीय धक्का आहे. विधानसभेनंतर जिल्हाप्रमुख पद काढून घेतल्याने ते प्रचंड नाराज होते. त्यानंतर दिलेली सहसंपर्क प्रमुखाची जबाबदारीही त्यांनी मनावर घेतली नव्हती. अखेर निवडणुका तोंडावर असताना त्यांनी पदाचा राजीनामा सचिव संजय मोरे यांच्याकडे पाठवून पक्षाला विचित्र पेचात टाकले आहे. त्यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाच्या चर्चांना आता आणखी वेग आला असून, जळगावच्या राजकीय क्षितिजावर मोठ्या चढाओढीची चिन्हे दिसू लागली आहेत.

जळगाव महापालिकेची निवडणूक दीड महिन्यांवर आल्यानंतरही शिंदे गटाकडून कोणतीच हालचाल नाही. मेळाव्यांसह प्रभाग समिती बैठकांचे आयोजन केले जात नसून, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना कोणीच विश्वासात घेत नाही. -निलेश पाटील (सहसंपर्कप्रमुख, शिवसेना शिंदे गट, जळगाव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here