जळगाव समाचार विशेष लेख | १२ एप्रिल २०२५
स्त्रीचा जन्म म्हणजे सृजनशक्तीची सुरुवात. ती लढती आहे, ती प्रेमळ आहे आणि ती सर्जनशील आहे. मात्र, या सर्जनशीलतेच्या प्रक्रियेत मासिक पाळी या नैसर्गिक गोष्टीकडे समाजात अजूनही अवघडलेपणाने आणि घाणेरड्या दृष्टीने पाहिलं जातं, यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकतं?
अलीकडे एका शिक्षणसंस्थेत घडलेली घटना जिथे मासिक पाळीमुळे एका विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बसवण्यात आलं, आणि तिला परीक्षा वर्गाच्या बाहेर द्यावी लागली हे केवळ अमानुष नव्हे, तर शैक्षणिक व्यवस्थेच्या नावावर कलंक आहे. आपण २०२५ मध्ये राहतोय, पण विचार मात्र अजूनही आदिम काळातल्या गुहेत अडकलेत. खरं तर अशा विचारसरणीला आपण गुहेतही जागा देऊ नये, कारण ती अश्मयुगीन माकडंही याहून प्रगत असावीत.
मासिक पाळी म्हणजे काय?
मासिक पाळी ही स्त्रियांच्या शरीरातील एक जैविक प्रक्रिया आहे. गर्भधारणेसाठी शरीराची तयारी करणारी ही प्रक्रिया, समाजातल्या निम्म्या लोकसंख्येला दर महिन्याला भोगावी लागते. ही कुठलीही दूषितता नाही, ही निसर्गाची देण आहे. मग अशा जैविक प्रक्रियेला “अस्पृश्यता” किंवा “अपवित्रता” असं लेबल लावणं, ही केवळ अज्ञानाची परिसीमा आहे.
शाळा ही विचारांची प्रयोगशाळा असते
शाळा म्हणजे केवळ गणित, विज्ञान, इतिहास शिकवण्याची जागा नसून, ती मूल्यांची आणि विचारांची जडणघडण करणारी पवित्र जागा असते. जर याच ठिकाणी एखाद्या मुलीला तिच्या शारीरिक स्थितीमुळे वेगळं बसवलं जात असेल, तर ती शाळा नव्हे, तो अंधश्रद्धेचा पिंजरा आहे.
मुलींना त्यांच्या मासिक पाळीबाबत कोणतीही लाज वाटू नये, असं वातावरण शाळांमध्ये असणं आवश्यक आहे. त्याउलट जर शिक्षिका, शिक्षक किंवा संस्थाचालकच याबाबत अंधश्रद्धाळू असतील, तर अशा संस्थांना ‘शाळा’ म्हणायचं तरी कसं?
मुलींच्या मनावर परिणाम
एका मुलीला तिच्या पहिल्या पाळीच्या वेळी वर्गाबाहेर बसवून, समाज काय संदेश देतो? “तू अपवित्र आहेस”, “तू वेगळी आहेस”, “तुझं शरीर घाण आहे”… हे संदेश तिच्या कोवळ्या मनात खोलवर घर करतात. ही वेळ असते तिच्या स्त्रीत्वाचं स्वागत करण्याची, तिच्या शरीराच्या बदलांचा आदर करण्याची. पण त्याऐवजी तिच्या मनावर निराशा, एकटेपणा आणि अपराधीपणाचा डोंगर लादण्यात येतो.
ह्याच वयात जे विचार मुलींच्या मनात पेरले जातात, ते पुढे तिच्या संपूर्ण आयुष्याला आकार देतात. मग तिला स्वतःच्या शरीराची लाज वाटते, आपल्याच अस्तित्वाबद्दल प्रश्न पडतात. ही शिक्षा आहे की शिक्षण?
धार्मिक किंवा सांस्कृतिक अंधश्रद्धा समाजाच्या प्रगतीला खीळ घालतात
अनेक धर्मांमध्ये मासिक पाळीबाबत चुकीच्या समजुती आहेत. पण शिक्षणाचा उद्देशच हा आहे की, अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या अंधारातून माणसाला बाहेर काढणं. जर आपणच धार्मिक किंवा परंपरेच्या नावाखाली मुलींना खाली पाहत असू, तर आपण आपल्या वैचारिक अधःपाताची कबुली देतो आहोत.
समाजाच्या मानसिकतेत बदल गरजेचा
आज अनेक मुली शाळा, कॉलेज, ऑफिस, मैदाने, विज्ञान, साहित्य, प्रशासन या सगळ्या क्षेत्रांत पुढे जात आहेत. तरीही त्यांना मासिक पाळीमुळे अपमानाचा सामना करावा लागतो, याचा अर्थ आपण कुठे तरी चूकतोय. पाळीबाबत उघडपणे बोलणं, तिचं शास्त्रीय आणि सामाजिक महत्त्व समजावणं, हे फक्त महिलांचं नव्हे तर पुरुषांचंही कर्तव्य आहे.
शाळा, सरकार आणि पालक यांची जबाबदारी
• शाळांनी मुलींसाठी स्वच्छतागृहांची सोय करावी, सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध कराव्यात.
• शिक्षकांना याबाबत संवेदनशीलतेचं प्रशिक्षण द्यावं.
• सरकारने प्रत्येक शाळेमध्ये आरोग्य आणि लैंगिक शिक्षणाचं प्रबोधन करावं.
• पालकांनी आपल्या मुलांशी या विषयावर मोकळेपणाने संवाद साधावा.
स्त्री नाही तुमचा विचार अपवित्र
मासिक पाळीवर बंधनं घालणं म्हणजे एका पंख्याला उडू देण्याऐवजी त्याला खालून खिळ्यांनी ठोकून टाकणं. आपण कोण आहोत हे आपल्या शरीराने नाही, तर आपल्या विचारांनी ठरतं. म्हणूनच आपला संघर्ष स्त्री-पुरुष असा नसून, प्रगल्भ विचार आणि अज्ञान अशा दोन विचारसरणींमधला आहे.
आज जर आपण मुलींना त्यांच्या शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल लाज वाटायला लावत असू, तर आपण शरमेने मान खाली घालायला हवी. समाजाला बदलायचं असेल तर तो बदल शाळेच्या उंबऱ्यापासून सुरू व्हायला हवा. मासिक पाळीवरचा कलंक पुसून टाकणं ही फक्त आरोग्याची नव्हे, तर स्त्रीच्या आत्मसन्मानाची चळवळ आहे. आणि ही चळवळ प्रत्येक घरातून, प्रत्येक शाळेतून सुरू झाली पाहिजे.
स्त्री पवित्र असते की नाही, यावर चर्चा करायची वेळ निघून गेली आहे. आता प्रश्न एवढाच आहे! समाज अजूनही किती काळ अपवित्र विचारांच्या मासिक पाळीत अडकून राहणार आहे?
आकाश जनार्दन बाविस्कर
मुख्य संपादक, जळगाव समाचार