जळगाव समाचार | ७ नोव्हेंबर २०२५
एकनाथ खडसे पक्षातून बाहेर पडल्यापासून जळगाव जिल्ह्यात भाजपची सर्व सूत्रे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या हातात केंद्रीत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील यशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीर केलेल्या जिल्हा निवडणूक प्रमुख व प्रभारी नियुक्त्यांमध्ये महाजन यांचा ठसा ठळकपणे उमटला आहे. नाशिकसह जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव राखत महाजन यांनी संघटनात्मक पातळीवर पक्षाला पुन्हा गती देण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिक शहर, नाशिक उत्तर–दक्षिण आणि मालेगाव या तीनही महत्त्वाच्या मतदारसंघांची जबाबदारी स्वतः स्वीकारून मंत्री महाजन यांनी नाशिक विभागातील निवडणुकीचा डाव आपल्या हातात ठेवला आहे. पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना शिंदे गट व अजित पवार गटावर दबाव निर्माण करण्याची ही महत्त्वाची संधी मानली जात आहे. स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांचा अंदाज घेत महाजन यांनी नाशिकमधील संघटन मजबूत करण्यासाठी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जबाबदाऱ्या वाटताना महाजन यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांवर भर दिला आहे. जळगाव शहर, पूर्व आणि पश्चिम मतदारसंघांची निवडणूक प्रभारी जबाबदारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तसेच, जळगाव शहर निवडणूक प्रमुख म्हणून आमदार सुरेश भोळे, जळगाव पूर्वसाठी ज्येष्ठ कार्यकर्ते नंदू महाजन तर जळगाव पश्चिमसाठी आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलांमुळे पक्ष संघटनेची सूत्रे महाजन यांच्या प्रभावक्षेत्रातच टिकवण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो.
विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत भाजप उमेदवाराला विजय मिळवून देणारे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे आता जळगाव लोकसभा क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मोहिमेची संपूर्ण धुरा देण्यात आली आहे. नाशिकातील जबाबदाऱ्यांमुळे महाजन यांचे जळगावकडे कमी लक्ष राहणार असल्याने चव्हाण यांनाच त्यांचे राजकीय ‘वारसदार’ म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे.

![]()




