जळगाव समाचार | ७ ऑक्टोबर २०२५
जिल्ह्यात १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान पोलिसांनी अवैध शस्त्रविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी सात ठिकाणी छापे टाकून १० देशी बनावटीची पिस्तुलं आणि २४ जिवंत काडतूस जप्त केली. याप्रकरणी १२ आरोपींविरुद्ध आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही मोहीम जिल्ह्यातील वाढत्या गंभीर गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच सण-उत्सव काळात संभाव्य अनुचित घटनांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर (चाळीसगाव विभाग), तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाण्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
जप्तीची ठिकाणं व आरोपी
• पाचोरा: समाधान बळीराम निकम – २ गावठी पिस्तुलं व १ काडतूस (आधीपासून ८ गुन्हे दाखल)
• अमळनेर: अनिल चंडाले – २ पिस्तुलं व ४ काडतूस
• यावल: युवराज उर्फ युवा भास्कर – १ पिस्तुलं व २ काडतूस (१ गुन्हा दाखल)
• भुसावळ बाजारपेठ: अमर कासोटे – १ पिस्तुलं व २ काडतूस (१ गुन्हा दाखल)
• वरणगाव: काविन भोसले – १ पिस्तुलं व १ काडतूस
• एमआयडीसी, जळगाव: विठ्ठल घोडे – १ पिस्तुलं व ४ काडतूस (३ गुन्हे दाखल)
• जळगाव शहर: युनूस उर्फ सद्दाम पटेल व इतर ३ जण – २ पिस्तुलं व १० काडतूस (पटेलवर २ गुन्हे दाखल)
या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्रविक्री आणि वापर करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे.