जळगाव पोलिसांचे मोठे यश: मोटारसायकल चोरी प्रकरणात तिघांना अटक; २२.४० लाखांचा मुद्देमाल जप्त…

 

जळगाव समाचार डेस्क| २० ऑगस्ट २०२४

जळगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याबाबत पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून २२.४० लाख रुपये किमतीच्या १४ मोटारसायकल आणि ६ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
जळगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या CCTNS NO १९५/२०२२ भादवि कलम ३७९ अंतर्गत गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पाळधी (ता. धरणगाव) येथील एका इसमाने चोरी केलेली मोटारसायकल वापरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोहेकॉ संघपाल तायडे, पोहवा मुरलीधर धनगर, पोना प्रविण भालेराव, आणि पोकों सागर पाटील यांना मिळाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, श्रीकृष्ण पटवर्धन आणि पथकाने पाळधी गावात जाऊन संशयित आरोपी मुस्तकीन अजीज पटेल (२८) याला अटक केली. चौकशीदरम्यान, त्याने जळगाव शहरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे साथीदार आमीन कालु मनियार (३९) आणि जाबीर सलामत शेख (२७) यांनाही अटक करण्यात आली.
चौकशीत आरोपींनी जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, खारघर नवी मुंबई, जुहू मुंबई, आणि बारडोली (गुजरात) येथून महागड्या मोटारसायकल आणि ऑटो रिक्षा चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तिघांकडून एकूण २२.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी केले. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here