जळगाव हादरलं ; निमखेडी शिवारात जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या

जळगाव समाचार | १५ डिसेंबर २०२५

जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात रविवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्र व दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तालुका पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर साहेबराव सोनवणे (वय २८, रा. निमखेडी शिवार) हा तरुण ट्रॅक्टर चालवून काम करत होता. जुन्या वादातून अज्ञात व्यक्तींनी रविवारी रात्री गावाजवळील राम मंदिर परिसरात त्याच्यावर धारदार शस्त्राने तसेच दगडाने हल्ला केला. हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत सागरला घटनास्थळीच टाकून देण्यात आले.

डोक्याला गंभीर मार लागल्याने सागर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. स्थानिकांनी तात्काळ त्याला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सागरच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान, या प्रकरणी तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. जुना वाद नेमका कशावरून होता, हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here