जळगाव समाचार | १४ जानेवारी २०२६
मकर संक्रांत सण उत्साहात साजरा होत असतानाच जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे बुधवारी (१४ जानेवारी) दुपारी एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून बाळकृष्ण सदाशिव कोळी (वय ४५, रा. भोलाणे) यांची भररस्त्यात चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात बाळकृष्ण कोळी यांचा लहान मुलगाही जखमी झाला असून सणासुदीच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण कोळी व संशयित आरोपी आकाश रामकृष्ण कोळी यांच्यात जुना वाद होता. मकर संक्रांतीच्या दिवशी भोलाणे येथील बसस्थानक परिसरात दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. रागाच्या भरात आकाश कोळी याने चॉपरने बाळकृष्ण कोळी यांच्यावर हल्ला चढवला. वर्मी तीन वार झाल्याने बाळकृष्ण कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये धावलेल्या त्यांच्या मुलाच्या हाताला चॉपरचा वार लागून तो जखमी झाला आहे.
मयत बाळकृष्ण कोळी हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, भाऊ तसेच जयेश व विशाल ही दोन मुले असा परिवार आहे. नातेवाईकांच्या माहितीनुसार, घटनेवेळी संशयित आरोपी आकाश कोळी याच्यासोबत त्याचे वडील रामकृष्ण ताराचंद कोळी व काका प्रकाश ताराचंद कोळी हेही उपस्थित होते. या प्रकरणी बाळकृष्ण कोळी यांचे भाऊ नरेंद्र सदाशिव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

![]()




