जळगाव समाचार | ४ मे २०२५
शहरातल्या श्री प्लाझा परिसरात शनिवारी रात्री घडलेली एक थरारक घटना संपूर्ण जळगाव शहराला हादरवून गेली. एका सामान्य कुटुंबातल्या युवकाचा, अनैतिक संबंधांच्या संशयातून, भर रस्त्यात खून करण्यात आला. या घटनेमुळे समाजातील नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर आणि मानवी मनातील सूडभावनेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मृत युवकाचे नाव आहे आकाश पंडित भावसार. वय केवळ ३०. तो जळगावमधील अशोक नगर येथे राहत होता आणि ट्रान्सपोर्ट व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात पत्नी पूजा, दोन लहान मुले आणि आई कोकिळाबाई असा परिवार आहे. आकाशच्या घरामध्ये शांततेचा आणि सामान्य जीवनाचा पसारा होता, परंतु एका रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेने हे आयुष्य उध्वस्त केलं.
शनिवार, ३ मे. रात्री साडेदहा वाजताचे सुमारास आकाशच्या पत्नीचा मावस भाऊ अजय मोरे, त्याचा मित्र चेतन सोनार आणि तीन अनोळखी युवक दोन स्कुटींवर श्री प्लाझा परिसरात आले. त्यांनी पूजासोबत फोनवर बोलून आकाश कुठे आहे याची माहिती मिळवली. आकाश त्या वेळी श्री प्लाझाजवळील ‘ए-वन भरीत सेंटर’जवळ होता, हे कळताच आरोपींनी त्याच ठिकाणी धाव घेतली.
रात्री ११ च्या सुमारास या पाचही जणांनी आकाशवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्याच्यासोबत असलेले शैलेश पाटील आणि वैभव मिस्त्री हे घाबरून पळाले. आकाशनेही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतली, पण त्या आरोपींनी पाठलाग करत दुसऱ्यांदा त्याच्यावर हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला आकाशला नागरिकांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेमागे केवळ एक क्षणिक भांडण नव्हते. पोलीस चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, अजय मोरे आणि पूजा यांच्यात अनैतिक संबंध होते, असा आकाशच्या आई कोकिळाबाई यांचा आरोप आहे. या नात्यामुळे आकाश आणि अजयमध्ये याआधी अनेकदा वाद झाले होते. या वादांची परिणती शेवटी हिंसाचारात झाली. आकाशच्या बहिणीने पोलिसांना सांगितले की, केवळ चार दिवसांपूर्वी अजयने आकाशला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या खून प्रकरणी पोलिसांनी अजय मोरे, चेतन सोनार आणि तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांची धरपकड सुरू आहे. तपास निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफोनि साजिद मन्सुरी तपास करत आहेत. आरोपी अजून फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विशेष पथक तयार करण्यात आले आहे.