जळगाव समाचार डेस्क| ५ सप्टेंबर २०२४
जळगाव (Jalgaon) धनश्री नगर, खोटेनगर येथील निवृत्त परिचारिका स्नेहलता संजय चुबळे (वय 60) यांची 30 लाख रुपयांसाठी निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 20 ऑगस्ट 2024 रोजी स्टेट बँकेतून पैसे काढल्यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या. तपासादरम्यान जळगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
स्नेहलता चुबळे या एप्रिल 2023 मध्ये साळवे (ता. धरणगाव) येथील आरोग्य केंद्रातून निवृत्त झाल्या होत्या. निवृत्तीनंतर त्या नाशिकमध्ये स्थायिक झाल्या होत्या, मात्र त्यांचे जळगावमध्येही धनश्री नगर येथे घर होते. 18 ऑगस्ट रोजी त्या जळगावच्या ग.स. सोसायटीच्या सर्वसाधारण सभेसाठी जळगावला आल्या होत्या. 20 ऑगस्ट रोजी त्या पेन्शनच्या कामासाठी स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेत गेल्या होत्या.
स्नेहलता यांच्या बेपत्त्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात 22 ऑगस्ट रोजी दाखल केली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेतल्याने गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान, संशयित आरोपी जिजाबराव अभिमन्यु पाटील (वय 48), कनिष्ठ लिपीक, जिल्हा परिषद, साळवा, आणि विजय रंगराव निकम (वय 46), लिपीक, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, अमळनेर यांना ताब्यात घेण्यात आले. 12 तासांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
जिजाबराव पाटील यांनी स्नेहलता यांना नाशिक येथे फ्लॅट घेण्यासाठी 28 लाख रुपये लागतील, असे सांगून त्यांच्याकडून बँकेतून 30 लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर, जिजाबराव आणि विजय निकम यांनी त्यांना हुंडाई क्रेटा गाडीत बसवून नेले आणि गळा दाबून त्यांची हत्या केली. मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून शिरपूर येथील तापी नदीत फेकल्याचे त्यांनी कबूल केले आहे.
स्नेहलता यांचा मृतदेह तापी नदीत शोधण्यासाठी पोलिसांचे पथक शिरपूर, नरडाणा, सारंगखेडा, शहादा आणि प्रकाशा परिसरात तपास करत आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1), 61(2), 238, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण तपासकार्यात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सफौ विजयसिंग पाटील, पोह जितेंद्र पाटील, पोह सुधाकर अंभोरे, पोह अकरम शेख, पोह महेश महाजन, पोह लक्ष्मण पाटील, पोना राहुल पाटील, भारत पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या पथकाने हि कारवाई केली.