जळगाव समाचार | २६ फेब्रुवारी २०२६
जळगाव शहरातील जळगाव महानगरपालिका अंतर्गत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदांसाठी गुरुवारी, दि. २६ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करण्यात आले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरली असून संबंधित उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठी भारतीय जनता पक्ष तर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला, तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी शिवसेना तर्फे ज्येष्ठ नगरसेविका सिंधुताई विजय कोल्हे यांनी आपला अर्ज सादर केला.
दोन्ही उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे सुपूर्द केले. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान महापालिकेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी भाजपचे गटनेते प्रकाश बालानी, उपगटनेते नितीन बरडे, स्थायी समिती सदस्य दीपक सूर्यवंशी, विशाल भोळे, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके तसेच महिला व बालकल्याण समिती सदस्य सुरेखा तायडे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, विद्या सोनवणे आणि गायत्री राणे उपस्थित होते. शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे तसेच समिती सदस्य प्रतिभाताई देशमुख, डॉ. अमृता सोनवणे, नगरसेवक प्रवीण कोल्हे आणि पियुष कोल्हे यांनीही उपस्थिती दर्शविली.
स्थायी समितीवर डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांची वर्णी लागल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर महिला व बालकल्याण समितीचे नेतृत्व अनुभवी सिंधुताई विजय कोल्हे यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीत उत्साहाचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे आता अधिकृत घोषणेची औपचारिकता पूर्ण होणे बाकी असून, त्यानंतर दोन्ही नव्या सभापतींकडून समित्यांच्या कामकाजाला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

![]()




