जळगाव महापालिका निवडणूक : पहिल्या दोन तासांत ५.५ टक्के जळगावकरांनी बजावला मतदानाचा हक्क…

 

जळगाव समाचार | १५ जानेवारी २०२६

जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीस आज गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता शांततेत सुरुवात झाली. मात्र सुरुवातीच्या दोन तासांत शहरातील मतदान केंद्रांवर अपेक्षित असा उत्साह दिसून आला नाही. सकाळी ९.३० वाजेपर्यंत शहरात सरासरी केवळ ५.५ टक्के इतकेच मतदान झाल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे.

प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार सकाळी ७.३० ते ९.३० या कालावधीत एकूण २४,१४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १४,४९४ पुरुष मतदारांचा तर ९,६५४ महिला मतदारांचा समावेश आहे. सकाळच्या सत्रात बहुतांश मतदान केंद्रांवर रांगा न दिसल्याने मतदानाचा वेग मंदावलेला होता. कडाक्याची थंडी तसेच घरगुती कामांमुळे महिला मतदारांची उपस्थिती तुलनेने कमी राहिल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, शहरातील काही संवेदनशील मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या कोणत्याही मोठ्या तक्रारी अद्याप समोर आलेल्या नाहीत. सुरुवातीला प्रतिसाद कमी असला तरी १० वाजेनंतर तसेच दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. प्रशासन व सामाजिक संस्थांकडून ‘आधी मतदान, मग काम’ असे आवाहन करण्यात येत असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here