जळगाव महापालिका निवडणूक रणधुमाळीला सुरुवात; आजपासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू

 

जळगाव समाचार | २३ डिसेंबर २०२५

राज्यात आजपासून महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यानिमित्ताने जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वपक्षीय नेते, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापालिकेतील सत्तेसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत असून, पक्षांतर्गत बैठका, रणनीती आखणी आणि मतदारांशी थेट संपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे. आजपासून निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्रांचे वाटप व स्वीकार करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी उपलब्ध असल्याने इच्छुक उमेदवारांची मोठी धावपळ सुरू आहे. जातवैधता प्रमाणपत्रे, शपथपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक प्रशासनाच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत. काही प्रभागांमध्ये उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन, समर्थकांची गर्दी आणि राजकीय ताकद दाखवण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.

महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. २ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, ३ जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. नुकत्याच नगरपालिका निवडणुकांतील अनपेक्षित निकालांच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेत कोण बाजी मारणार, याबाबत संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here