जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर भाजपचे बहुमत, अनुभवींना संधी…

 

जळगाव समाचार | १७ फेब्रुवारी २०२६

जळगाव महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या १६ सदस्यांसह महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांची निवड सोमवारी विशेष महासभेत करण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपमहापौर मनोज चौधरी आणि आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्याच वर्षी तिन्ही प्रमुख पक्षांनी अनुभवी नगरसेवकांना प्राधान्य देत दोन्ही समित्यांची बांधणी केली असून, मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा दोन्ही समित्यांवर स्पष्ट वरचष्मा दिसून आला.

सभेच्या प्रारंभी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने स्थायी समिती सदस्यांची नावे बंद पाकिटातून महापौरांकडे सादर करण्यात आली. महापौरांनी सभागृहात या नावांचे वाचन करताच निवड झालेल्या सदस्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपचे १०, शिवसेना शिंदे गटाचे पाच आणि शिवसेना ठाकरे गटाचा एक सदस्य अशी पक्षनिहाय रचना ठरली, ज्यामुळे प्रशासनिक व आर्थिक निर्णयप्रक्रियेत भाजपची भूमिका अधिक प्रभावी राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

भाजपकडून दीपक सूर्यवंशी, नितीन लढ्ढा, विशाल भोळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे आणि नितीन सपके यांची स्थायी समितीवर निवड झाली. शिवसेना (शिंदे गट) कडून विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे आणि सागर सोनवणे यांना संधी देण्यात आली, तर शिवसेना (ठाकरे गट) कडून इब्राहिम पटेल यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांची निवडही याच विशेष महासभेत करण्यात आली असून, नव्या समित्यांच्या स्थापनेमुळे महानगरपालिकेच्या कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here