जळगाव समाचार डेस्क | ३ ऑक्टोबर २०२४
जळगाव एमआयडीसीचा ‘डी’ दर्जा उन्नत करून ‘डी प्लस’ दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. त्यांनी उद्योग भवनासाठी 23 कोटी रुपये आणि ट्रक टर्मिनलसाठी 13 कोटी रुपये मंजूर केल्याचेही सांगितले. छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित खान्देश विभागस्तरीय ‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी सुनील घाटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या मागण्या मान्य
उद्योग भवनात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी उद्योगमंत्र्यांनी मान्य केली असून दोन दिवसांत याबाबत लेखी आदेश काढण्यात येणार आहे. हे कार्यालय आठवड्यात दोन दिवस उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहील.
चिंचोली व कुसंबे येथे नवीन औद्योगिक क्षेत्र
उद्योगमंत्री सामंत यांनी जळगाव जिल्ह्यातील चिंचोली आणि कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर चोपडा आणि पाचोरा तालुक्यांना नवीन एमआयडीसी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जळगावला विस्तारित एमआयडीसीला मंजुरी मिळाली असून उद्योगमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात उद्योजकांसाठी 3,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी वितरित केल्याचेही त्यांनी नमूद केले.
96 हजार कोटींची स्थानिक गुंतवणूक, 85 हजार रोजगार
राज्यात गेल्या दोन वर्षांत 4.5 लाख कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. यापैकी 96 हजार कोटी रुपये स्थानिक उद्योजकांनी गुंतवले असून त्यातून 85 हजार रोजगारनिर्मिती झाल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वकर्मा योजनेचा उल्लेख करत राज्यातून सर्वाधिक 11.50 लाख नोंदी झाल्याची माहिती दिली.
टेक्सटाईल पार्कची मागणी
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क उभारण्याची मागणी केली. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमात स्थानिक उद्योजकांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.