जळगाव समाचार | १८ एप्रिल २०२५
जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील (एलसीबी) तिघा पोलीस कर्मचाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कठोर कारवाई केली आहे. हप्तेखोरी, व्हिडीओ पुरावे आणि फरार आरोपीशी फोनवर सातत्याने संपर्क यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
व्हिडीओ समोर आल्यावर उचलबांगडी
एलसीबीचे कर्मचारी गजानन देशमुख आणि संघपाल तायडे यांनी गुटखा व पेट्रोल विकणाऱ्या दुकानदाराकडून हप्ता घेतल्याचा व्हिडीओ थेट एसपींना मिळाला होता. तपासानंतर व्हिडीओ खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांची बदली करत त्यांची उचलबांगडी करण्यात आली. देशमुख यांची बदली पाचोरा येथे, तर तायडे यांची फत्तेपूर येथे करण्यात आली आहे.
352 वेळा आरोपीशी फोनवर संपर्क
एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांच्याविरुद्ध आणखी गंभीर बाब समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी अरबाज याच्याशी त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून तब्बल 352 वेळा संपर्क साधल्याचे रेकॉर्ड समोर आले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
पोलिस दलात खळबळ
यापूर्वी पाचोरा तालुक्यात वाहनधारकांकडून पैसे घेतल्याप्रकरणी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर जळगाव शहरात दोन कर्मचारी लाच घेताना पकडले गेले. आता एलसीबीतील ही कारवाई झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा प्रकारांवर कठोर भूमिका घेतली असून, भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला आहे.