जळगाव जिल्हा कारागृहात तरुण बंद्यावर दोन सहबंदींकडून मारहाण; गुन्हा दाखल…

जळगाव समाचार | २९ सप्टेंबर २०२५

जिल्हा कारागृहात आठ दिवसांपूर्वी दाखल झालेल्या एका तरुण बंद्यावर दोन सहबंदींकडून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २७ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन बंद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोहम गोपाल ठाकरे (वय २०) हा एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपी असून, २० सप्टेंबर रोजी त्याला जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले होते. त्याला बॅरेक क्रमांक १३, तीन क्रमांकाच्या सर्कलमध्ये ठेवण्यात आले होते.

२७ सप्टेंबर रोजी सकाळी तो झोपलेला असताना कुणाल गोपाल चौधरी या बंद्याने पायाने धक्का देऊन उठविले व “बाहेर ये, मला तुझ्याशी काम आहे” असे सांगितले. सोहम उठताच त्याला मारहाण सुरू करण्यात आली. त्यावेळी दुसरा बंदी अजय मोरे याने त्याला पकडून ठेवले. दरम्यान, कुणाल चौधरी याने सोहमचे डोके बॅरेकच्या दरवाजावर आपटले, यात त्याच्या कपाळ व नाकाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.

घटनेदरम्यान इतर बंद्यांनी सोहमची सुटका केली. मात्र, घटनेनंतर जवळपास दहा मिनिटांनी कारागृहातील कर्मचारी तेथे पोहोचला. या घटनेनंतर जखमी सोहम ठाकरे याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून मारहाण करणाऱ्या कुणाल चौधरी व अजय मोरे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here