जळगाव समाचार डेस्क| १५ ऑगस्ट २०२४
जळगाव (Jalgaon) शहरातील गोलाणी मार्केटमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एक नामांकित व्यावसायिक रमेश देवराम पाटील (५१) यांनी आज सकाळी दहा वाजता आपल्या दुकानात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने जळगाव शहरातील व्यापारी वर्तुळात खळबळ माजली आहे.
रमेश पाटील हे गेल्या १५ ते २० वर्षांपासून कॉम्प्युटर व्यवसायात कार्यरत होते. त्यांचे ‘ॲरोटेक कॉम्प्युटर’ नावाचे दुकान गोलाणी मार्केटच्या ग्राउंड फ्लोअरवर सी-२४६ क्रमांकाने ओळखले जात असे. नेहमीप्रमाणे आज सकाळी १० वाजता त्यांनी आपले दुकान उघडले. दुकान उघडल्यानंतर, त्यांनी देवांच्या फोटोला अगरबत्ती लावून पूजा केली आणि नंतर शटर अर्धवट बंद करून गळफास घेत जीवन संपवले.
घटनेच्या वेळी दुकानात काम करणाऱ्या त्यांच्या साडूच्या मुलाने शटर उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला. शटर उघडताच त्याला रमेश पाटील दोरीला लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्याने तात्काळ आरडाओरडा केल्याने शेजारच्या व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्परतेने दोर कापून रमेश पाटील यांना खाली उतरवले आणि तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णवाहिकेतून हलवले. परंतु, उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
रमेश पाटील यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या आत्महत्येच्या मागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रमेश पाटील यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेने पाटील कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे जळगाव शहरातील व्यापारी आणि स्थानिक नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. रमेश पाटील हे आपल्या कामामुळे ओळखले जात असताना, त्यांचा असा अचानक केलेला निर्णय अनेकांना धक्का देऊन गेला आहे.

![]()




