वाल्मिक नगरात थरार; वडिलांवर हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तरुणाचा गोळीबार

 

जळगाव समाचार | ११ मार्च २०२६

जळगाव शहरात मंगळवारी (१० मार्च) दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास वाल्मिक नगरातील घरकुल चौकात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्याच्या उद्देशाने अनिल राठोड या तरुणाने गावठी कट्ट्यातून दोन राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक नगरातील श्रीराम चौकात राहणारे रसाल राठोड (वय ४८) हे नेरीनाका स्मशानभूमी परिसरातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रसाल राठोड यांनी आपल्या मुलगा अनिल राठोड याला या घटनेची माहिती दिली. वडिलांवर झालेल्या मारहाणीची बातमी कळताच संतापलेल्या अनिल राठोडने आरोपींचा शोध सुरू केला आणि काही वेळातच वाल्मिक नगरातील घरकुल चौकात त्याला वडिलांना मारहाण करणारे तिघे जण बसलेले दिसले.

दरम्यान, अनिल राठोडने आपली दुचाकी त्या ठिकाणी वळवून कमरेला लावलेल्या गावठी कट्ट्यातून आरोपींच्या दिशेने सलग दोन गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच धावपळ उडाली. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही गटातील संशयितांची धरपकड सुरू केली. मारहाण करणाऱ्या गटातील प्रशांत चौधरी व हिमांशू सांखला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्या गटातील सुनील राठोड यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य आरोपी अनिल राठोड हा गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असून शनिपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे जळगाव शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here