दुचाकीवरून गांजा वाहतूक करणारे दोघे जेरबंद…

जळगाव समाचार डेस्क| १७ जानेवारी २०२५

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चोपडा ते शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ गांजा वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा, ३६ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील विजय देवराम मोरे (२८) आणि धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथील अविनाश भिका पाटील (२६) अशी या संशयितांची नावे आहेत. हे दोघे शिरपूरहून चोपडाकडे दुचाकीवरून जात होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकुलखेडा गावाजवळ त्यांना थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान त्यांच्या जवळून गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासानुसार, त्यांनी हा गांजा विक्रीसाठी चोपडा शहरात आणला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

शहर पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एकनाथ भिसे, गणेश वाघमारे, अनिल जाधव, विलेश सोनवणे, दीपक माळी, रवींद्र चव्हाण, रवींद्र पाटील, हेमंत पाटील, प्रदीप चावरे, जितेंद्र चव्हाण, गोकुळ सोनवणे, योगेश बोडखे आणि विनोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. सध्या दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here