जळगाव समाचार डेस्क;
सध्या शहरात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. प्रत्येक दिवशी शहरातून चोरी झाल्याचे वृत्त असते. यामुळे चोरट्यांवर कायद्याचा वचक आहे की नाही ? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. अश्यातच शहरातील जुनाखेडी रोडवरील सदाशिव नगरात बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातून सोन्याचे-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ५८ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना मंगळवारी २३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Jalgaon)
याबाबत प्राप्त माहितीनुसार, सदाशिव नगर, जुनाखेडी रोड परिसरात नितीन नीना सुरवाडे हा 31 वर्षीय तरुण आपल्या परिवारासह राहतो. मात्र दि. २१ ते २३ जुलै दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडत घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ५८ हजार २८५ रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
ही बाब काल मंगळवारी २३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता निदर्शनास आली.त्यानंतर नितीन सुरवाडे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रघुनाथ पवार हे करीत आहे.

![]()




