गणेशोत्सव बंदोबस्तात शनिपेठ पोलिसांचे यश ; दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक

 

जळगाव समाचार | २९ ऑगस्ट २०२५

जळगाव शहरासह जिल्ह्यात पुन्हा गुन्हेगारीचं सावट दाटू लागलं असून, वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या बंदोबस्तादरम्यान शनिपेठ पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश मिळवलं आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन (३२, रा. तळेले कॉलनी) व संदीप विजय नाथ (२८, रा. नाथ गल्ली, तांबापुरा) यांचा समावेश असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र महाजन हा खून व प्राणघातक हल्ल्यांच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याने त्याला यापूर्वी दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, तो रथ चौक परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. तर गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांना भिलपुरा व घाणेकर चौकादरम्यान संदीप नाथ हा हातात चॉपर घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करताना आढळून आला. त्याला जागेवरच पकडून त्याच्याकडील धारदार शस्त्र जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी व उपनिरीक्षक योगेश ढिकले यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने केली. या पथकात प्रमोद पाटील, शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, नवजीत चौधरी, योगेश साबळे, रविंद्र तायडे, निलेश घुगे, अमोल बंजारी, पराग दुसाने व प्रतिभा खैरे यांचा समावेश होता. पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरात गुन्हेगारांच्या मनात धसकाच बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here