जळगाव समाचार | ६ मार्च २०२५
शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (४ मार्च) सकाळी ११ वाजता दोन भामट्यांनी ६२ वर्षीय वृद्धाची ८० हजार रुपयांची फसवणूक केली. त्यांनी पोलीस असल्याचे भासवून त्याच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.
रामचंद्र पारप्यानी (वय ६२, रा. सिंधी कॉलनी) हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगत वाहन तपासणीचे कारण दिले. यानंतर त्यांनी पारप्यानी यांना सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याची चेन व लॉकेट आणि ३० हजार रुपये रोख एका रुमालात बांधून काढायला सांगितले. हे सामान त्यांच्या गाडीच्या सिटखाली ठेवत असल्याचे सांगून दोघांनी ते लंपास केले आणि पळून गेले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पारप्यानी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ३० ते ४० वयोगटातील दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. तपास निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र उगले पुढील तपास करत आहेत.

![]()




