जळगावच्या नीरज जोशीची महाराष्ट्र रणजी संघात निवड

 

जळगाव समाचार | १४ जानेवारी २०२६

जैन स्पोर्ट्स अकॅडमी तसेच जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा होतकरू खेळाडू नीरज चंद्रशेखर जोशी याची प्रतिष्ठित रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. जळगाव शहरातील बालाजी पेठ येथील रहिवासी असलेल्या नीरजच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे.

नीरज जोशी हा अष्टपैलू खेळाडू असून तो डावखुरा गोलंदाज व आघाडीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. मागील वर्षी त्याने महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघाचे कर्णधारपद भूषविले होते. तसेच सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत सहभाग घेतला असून यंदा २३ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचा उपकर्णधार म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली आहे. सातत्यपूर्ण कामगिरी, मेहनत व शिस्तबद्ध सरावाच्या जोरावर त्याने रणजी संघात स्थान मिळविले आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे त्याला रणजी स्पर्धेसाठी तातडीने बोलावण्यात आले असून तो पुणे येथे रवाना झाला आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिल सदस्य तसेच जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बूरकुल, मुस्ताक अली तन्वीर अहमद व सहकाऱ्यांनीही नीरजच्या यशाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here