जळगाव समाचार | २४ ऑगस्ट २०२५
महापालिकेतील प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान व सुसूत्र करण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्तांनी विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची खांदेपालट केली आहे. या बदल्यांमुळे विभागांतील जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल होऊन कामकाज अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आस्थापना विभागातील लिपिक रवींद्र जाधव यांची बदली प्रभाग समिती क्र. ३ मध्ये करण्यात आली असून, प्रभाग समिती क्र. ३ चे लिपिक समाधान घोडके यांना आस्थापना विभागात नेमण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, आस्थापना विभागातील लिपिक अर्जुन सोनार यांची बदली प्रभाग समिती क्र. ४ मध्ये झाली असून, प्रभाग समिती क्र. ४ चे प्रसाद पवार यांना आस्थापना विभागात पाठविण्यात आले आहे.
प्रभाग समिती क्र. ३ चे लिपिक राहुल सुशिर यांना महिला व बालकल्याण विभागात बदली देण्यात आली असून, त्यांच्या जबाबदारीत जन्म-मृत्यू विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागातील प्रणाली दुसाने यांची नेमणूक प्रभाग समिती क्र. ३ मध्ये करण्यात आली आहे.
याशिवाय, आस्थापना विभागातील लिपिक किशोर विसावे यांना प्रभाग समिती क्र. २ मध्ये बदली करण्यात आली असून, प्रभाग समिती क्र. २ चे लिपिक दिलीप चौधरी यांना आस्थापना विभागात हलविण्यात आले आहे. तसेच नगररचना विभागातील इंदूबाई भापकर यांची बदली ई-गव्हर्नन्स विभागात करण्यात आली आहे.
दरम्यान, स्वतंत्र आदेशाद्वारे जनसंपर्क अधिकारी व महिला बालकल्याण विभागातील महेंद्र पाटील यांच्याकडे वरिष्ठ लिपिक, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग व विवाह नोंदणी कार्यालयाचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर प्रकल्प विभागातील प्रदीप निंबाळकर यांची बदली जन्म-मृत्यू विभागात करण्यात आली आहे.