जळगाव समाचार | १७ फेब्रुवारी २०२६
जळगाव शहरात रविवारी सायंकाळी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. श्याम प्रभाकर पाटील (वय २०, रा. बोदवड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो जळगाव येथील एका खासगी महाविद्यालयात औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. दौलतनगर परिसरातील आपल्या राहत्या खोलीत त्याने रविवारी सायंकाळी गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासादरम्यान श्यामच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पवार यांनी कोणतीही चूक नसताना वर्गमित्रांसमोर मारहाण केल्याचा उल्लेख असून, त्या अपमान व मानसिक धक्क्यामुळे टोकाचा निर्णय घेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बोदवड येथून श्यामचे वडील प्रभाकर पाटील व अन्य नातेवाईक जळगावात दाखल झाले. संबंधित प्राचार्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती; मात्र तक्रारीनंतर पुढील कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांवरील मानसिक ताणतणाव व शिस्तीच्या नावाखाली होणाऱ्या प्रकारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

![]()




