शहरात तरुणीला जबरदस्ती बुरखा घालायला लावल्याने तणाव; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात…


जळगाव समाचार | ५ जून २०२५

जळगावच्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या एका तरुणीला जबरदस्तीने बुरखा घालायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

यावल तालुक्यातील एका गावातील पीडित तरुणी फार्मसी शिकत आहे. तिची ओळख तिच्याच कॉलेजमधील फरहान खाटीक या तरुणाशी झाली होती. सोशल मीडियावरून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत त्याने तिला प्रेमाच्या प्रस्ताव दिला. तिने नकार दिल्यानंतर त्याने आत्महत्येची धमकी दिली.

यानंतर त्याने वेगवेगळे धार्मिक व्हिडीओ पाठवून तिच्यावर मानसिक दबाव टाकला. काही काळासाठी तरुणी गप्प राहिली.

बुधवारी तरुणी डीमार्टमध्ये खरेदीसाठी गेली असता, फरहान आणि त्याचा मित्र जमील कुरेशी यांनी तिचा पाठलाग केला. फरहानने तिला बुरखा घालायला लावला आणि न घातल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. घाबरून तरुणीने चेंजिंग रूममध्ये जाऊन बुरखा घातला.

नंतर फरहानने तिच्यासोबत खरेदीही केली. मात्र बिल काउंटरवर बुरखा काढायला सांगितल्यावर, “बुरखा काढलास तर मारून टाकेन” अशी धमकी दिली. हे ऐकून आसपासच्या लोकांनी पोलिसांना बोलावलं.

रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं. तरुणीच्या तक्रारीनुसार फरहान खाटीक आणि जमील कुरेशी यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here