भडगाव तालुक्यात शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खुन; आरोपी दोन तासांत गजाआड…

 

जळगाव समाचार डेस्क| १३ ऑगस्ट २०२४

पिचडे गावात शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून खुनाच्या प्रकरणाचा भडगाव पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडा करून आरोपीला अटक केली आहे. (Jalgaon District)
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पिचडे गावातील पोलीस पाटील पिचडे यांनी पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली की, पिचडे गावातील विठ्ठल आनंदा पाटील (६१) हे आपल्या खळ्यात झोपले असताना त्यांच्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने वार करून खून केला आहे. या माहितीच्या आधारे, पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांचेसह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोलीस दाखल होताच विठ्ठल पाटील हे आपल्या खळ्यातील खाटीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, घटनास्थळी आरोपीचा कोणताही पुरावा सापडला नाही.
त्यानंतर गावकऱ्यांकडून माहिती घेतली असता, मयत विठ्ठल पाटील आणि त्यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील यांच्यात शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू असल्याचे समजले. दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विठ्ठल पाटील हे खळ्यात बकऱ्या बांधण्यासाठी तारजाळी बांधण्याचा प्रयत्न करीत असताना, अभिमन पाटील यांनी त्याला विरोध केला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते.
या माहितीच्या आधारे, पोलिसांनी लगेचच अभिमन पाटील याचा शोध घेतला. त्यांना त्यांच्या घरातच ताब्यात घेतले असता, त्यांचे कपडे रक्ताने माखलेले असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, अभिमन पाटील यांनी आपल्या लहान भावाचा डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची कबुली दिली.
त्यानुसार, मयत विठ्ठल पाटील यांची पत्नी रेखाबाई विठ्ठल पाटील यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा नोंदवण्याचे कृत्य भारतीय न्याय सहिता २०२४ चे कलम १०३(१) अंतर्गत करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी, जळगाव, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, चाळीसगाव परिमंडळ, आणि सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख, चाळीसगाव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, स.फौ. अनिल अहिरे, पोहेकाँ निलेश ब्राम्हणकार, पोहेकाँ मुकुंद परदेशी, पोकाँ प्रवीण परदेशी, पोकाँ महेंद्र चव्हाण, पोकों सुनिल राजपुत, पोकाँ संदिप सोनवणे, पोकाँ जितेंद्र राजपुत, पोकों संभाजी पाटील (चालक), होमगार्ड प्रदिप सुभाष पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here