जळगाव समाचार डेस्क;
जळगावमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत 36,000/- रुपयांची लाच स्वीकारताना एक कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील (वय 57) यांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांनी तक्रारदाराकडून 50,000/- रुपयांची लाच मागितली होती, परंतु तडजोडीनंतर 36,000/- रुपये स्वीकारताना पकडण्यात आले.
तक्रारदार हे माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष आणि मुकादम आहेत. त्यांच्या मित्रालाही मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली होती, आणि या प्रकरणाची सुनावणी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे चालू होती. सहायक कामगार आयुक्तांकडून सुनावणीचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी 50,000/- रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या लाच मागणीची तक्रार 5 ऑगस्ट 2024 रोजी लाचलुचपत विभागाकडे केली होती.
तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, आज 8 ऑगस्ट रोजी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. चंद्रकांत पाटील यांनी तडजोडीनंतर 36,000/- रुपये स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास अधिकारी आणि पथक
सापळा कारवाईचे नेतृत्व पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी केले. त्यांच्या सोबत पोलीस नायक बाळू मराठे, सुनिल वानखेडे, राकेश दुसाणे, किशोर महाजन, पो नि एन एन जाधव, स फौ दिनेश पाटील, सुरेश पाटील, पो.ह प्रदिप पोळ, पो कॉ. प्रणेश ठाकूर, पो कॉ सचिन छाटे, अमोल सूर्यवंशी हे होते.