जळगाव समाचार | १८ नोव्हेंबर २०२५
जळगाव–भादली रेल्वे रूळावर रविवारी मध्यरात्री दीड वाजता दीनकर नगरातील हर्षल प्रदीप भावसार (३१) याचा मृतदेह अंगावर मारहाणीचे व्रण असलेल्या अवस्थेत आढळून आला. तरुणाची दुचाकी मात्र को.ऊ. कोल्हे शाळेजवळ पडलेली मिळून आली. या संशयास्पद मृत्यूमुळे कुटुंबीयांनी घातपाताचा आरोप करत हर्षलला मारहाण करून मृतदेह रुळावर टाकल्याची शक्यता वर्तवली आहे. तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हर्षल भावसार हा एमआयडीसीतील कंपनीत काम करणारा तरुण असून, रविवारी सायंकाळी आईला भाजी देऊन घराबाहेर पडला, मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. मध्यरात्री रेल्वे खांबा क्रमांक ४२३ जवळ मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोहेकॉ प्रदीप राजपूत व प्रकाश चिचोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. सुरुवातीला ओळख पटत नसल्याने पोलिसांनी अंगझडती घेतली असता पाकीट व आधारकार्ड मिळून आल्याने मृत व्यक्तीची ओळख हर्षल भावसार अशी करण्यात आली.
तपासाच्या धाग्यावर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली असून, मृतदेह रुळावर आढळला असताना त्याची दुचाकी वेगळ्या ठिकाणी मिळाल्याने संशय अधिक गडद झाला आहे. हर्षलसोबत वाद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. तसेच ज्यांच्यासोबत वाद झाल्याचे समोर आले आहे त्या दोघांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू असून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.

![]()




