जळगाव समाचार | १४ डिसेंबर २०२५
महापालिका निवडणुकीचा बिगूल लवकरच वाजण्याची शक्यता लक्षात घेता जळगाव महापालिकेसाठी भाजपने तयारीला वेग दिला आहे. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत आघाडीवर असलेल्या भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी पार पडणार आहेत. यासाठीचा मुहूर्तही पक्षाने आधीच निश्चित केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ऐनवेळी युती फिस्कटल्याने भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना स्वतंत्रपणे एकमेकांविरोधात लढावे लागले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, जळगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकीत युती झाली अथवा नाही झाली तरी भाजपने सर्व ७५ जागा लढविण्याची तयारी ठेवावी, असे स्पष्ट निर्देश नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत देण्यात आले. नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता असल्याने पक्षाने रणनिती ठरवत जोरदार तयारी सुरू केली आहे.
मागील महापालिका निवडणुकीत भाजपने जळगावमध्ये ५७ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले होते. याच यशाची पुनरावृत्ती करण्याच्या उद्देशाने आतापासूनच संघटनात्मक पातळीवर कामाला लागण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगितले जाते. त्याचाच भाग म्हणून आता थेट इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
भाजप नेते तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जिल्हा निवडणूक प्रभारी व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, महानगरपालिका निवडणूक प्रमुख आमदार सुरेश भोळे आणि महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती होणार आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता मंडल क्रमांक एकमधील प्रभाग एक ते चारपासून सुरू होणाऱ्या या मुलाखती दुपारी चार वाजेपर्यंत विविध मंडल व प्रभागनिहाय घेतल्या जाणार असून, त्यानंतरच उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा संयोजक विशाल त्रिपाठी आणि सहसंयोजक नितीन इंगळे यांनी दिली.

![]()




