जळगाव जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त; मदतीसाठी वाट पाहत हतबल

 

जळगाव समाचार | २७ सप्टेंबर २०२५

जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच-सहा महिन्यांपासून अतिवृष्टी, पुर, अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळ यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगामासह उन्हाळ्यातील चक्रीवादळानेही पिकांना तडाखा दिला. एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे ८०९ गावांमधील ११ हजार ५९३ हेक्टर क्षेत्रावरील केळी, मका, पपई आणि इतर फळपिकांचे नुकसान होऊन २४ हजार ७३३ शेतकरी बाधित झाले होते. त्यानंतर जूनमध्ये पुन्हा चक्रीवादळ व पावसामुळे ४७७२ हेक्टरवरील केळीसह फळपिकांचे नुकसान झाले. ऑगस्ट महिन्यात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टीमुळे ८०२८ हेक्टरवरील कपाशी, मका, ज्वारी व कांदा पिके बाधित झाली. सप्टेंबरमध्येही आतापर्यंत ८० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.

उन्हाळ्यातील नुकसानीसाठी शासनाने एप्रिलमध्ये ४ कोटी ५३ लाख १७ हजार आणि मे महिन्यात १९ कोटी ९६ लाख १६ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांना वितरीत केले आहे. मात्र जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या ९२ हजार हेक्टरवरील नुकसानीसाठी अहवाल तयार करण्यात व मंजुरी मिळण्यात विलंब होत आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळत नाही. विशेष म्हणजे शासनाने मदत देताना आधीच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करून नंतरच्या महिन्याच्या अनुदानाला प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबल्याने जून महिन्यातील ४७७१ हेक्टरवरील नुकसानीबाबतच्या मदतीपासून तब्बल १० हजार १५८ शेतकरी अद्याप वंचित आहेत.

तसेच, ज्या शेतकऱ्यांना मदत मंजूर झाली आहे त्यांच्याही खात्यात ई-केवायसीच्या तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा झाले नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही मे महिन्यापासूनचे अनुदान मिळालेले नाही. सतत नैसर्गिक संकटांचा सामना करत असलेले शेतकरी अशा परिस्थितीत आर्थिक मदतीसाठी हतबल झाले आहेत.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन १७ हजार ३३२ शेतकरी बाधित झाले होते. त्यासाठी ९.८६ कोटी रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. जूनचे प्रलंबित अनुदानही लवकरच मिळेल. – गुलाबराव पाटील (पालकमंत्री, जळगाव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here