जळगाव विमानतळ विस्ताराला वेग; कुसुंबा शिवारात जमिनी संपादनाची प्रक्रिया गतीमान

 

जळगाव समाचार | २६ नोव्हेंबर २०२५

राज्यात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या विमानतळ विकासाला आता नवी गती मिळाली आहे. केंद्र सरकारने सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर कुसुंबा शिवारातील जमिनींचे संपादन करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. जिल्ह्याच्या उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला चालना देणारा हा विकासप्रकल्प भविष्यातील सर्वांगीण प्रगतीचा मजबूत पाया मानला जात आहे.

विमानतळ विस्तारासाठी आवश्यक जमिनीच्या संपादनाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत मालकी, मोजणी, मूल्यांकनासह सादर केलेल्या अहवालांची तपासणी करण्यात आली. धावपट्टी विस्तार, सुरक्षा परीघ, सेवा सुविधा आणि इतर पायाभूत कामांच्या गरजांवर अधिकारी आणि संबंधित विभागांमध्ये सविस्तर चर्चा झाली. हितसंबंधित शेतकरी प्रतिनिधींसोबत संवाद साधत त्यांच्या शंका, अपेक्षा आणि पारदर्शक प्रक्रियेची हमी प्रशासनाने दिली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी), जिल्हा प्रशासन आणि विमानतळ प्राधिकरण यांच्यातील समन्वय अधिक परिणामकारक करण्याचे नियोजनही बैठकीत ठरले.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी घुगे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या., मुंबई यांना भूसंपादन प्रक्रियेचा अंतिम अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. या वेळी एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, भूसंपादन समन्वय अधिकारी, जळगावचे उपविभागीय अधिकारी, विमानतळ संचालक, विधि अधिकारी तसेच जमिनी संपादित होणारे शेतकरी उपस्थित होते. जळगाव विमानतळ भविष्यात जिल्ह्याच्या विकासाचे केंद्रबिंदू बनणार असून, भूसंपादन प्रक्रिया जलद, नियमानुसार आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्याबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सध्या जळगाव विमानतळावरून गोवा, हैदराबाद, पुणे आणि मुंबईसाठी नियमित विमानसेवा सुरू असून येथे हवाई प्रशिक्षण केंद्रही कार्यरत आहे. मात्र विमानतळ केवळ एकाच पाळीत कार्यरत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांच्याकडे धाव घेत तातडीच्या आर्थिक व तांत्रिक सहाय्याची मागणी केली होती. विमानतळ विस्तार, सुविधा वाढवणे, अतिरिक्त पाळ्या सुरू करणे आणि परिसरातील पर्यटन–व्यापाराला चालना देण्यासाठी त्यांनी सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. विमानतळाचा विस्तार झाल्यास जिल्ह्यास जलद व सुलभ हवाईसेवा उपलब्ध होण्यासोबतच व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला नवे दरवाजे उघडतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here