आकाशवाणी चौकातील अपघातात गंभीर जखमी झालेल्या रागिणी पाटील यांचे निधन…


जळगाव समाचार | १२ मार्च २०२५

आकाशवाणी चौकात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रागिणी चंपालाल पाटील (वय ४५, रा. भुसावळ) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथील सैनिक रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र पाच दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज मंगळवारी अपयशी ठरली.

दि. ६ रोजी रागिणी पाटील या पतीसोबत भुसावळहून जळगाव येथील रुग्णालयात तपासणीसाठी येत असताना आकाशवाणी चौकात त्यांच्या दुचाकीला ट्रकचा कट लागला. त्यामुळे त्या खाली पडल्या आणि ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. पाच दिवस उपचार सुरू असतानाही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांचे निधन झाले.

रागिणी पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीला मुलगी झाल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र दुर्दैवाने कुटुंबाला मोठा आघात बसला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here