जळगाव समाचार | ६ मार्च २०२५
जळगाव शहरात महामार्गावर बुधवारी (५ मार्च) रात्री ११ वाजता भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरच्या धडकेत विजय भोई (वय ४५, रा. आशाबाबा नगर) यांचा जागीच मृत्यू झाला.
विजय भोई हे शिव कॉलनी येथे पान टपरी चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रात्री टपरी बंद करून घरी जात असताना, भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, कंटेनरने दुचाकी काही अंतर फरफटत नेली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक महामार्गावर उतरले आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. नागरिकांचा आरोप होता की, महामार्गावर सतत अपघात होतात, पण प्रशासन काहीच करत नाही.
नागरिकांच्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, नागरिकांची समजूत काढली आणि आंदोलन शांत केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, विजय भोई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तसेच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

![]()




