वाळू माफियाकडून अडीच लाखाची लाच घेणाऱ्या हवालदारावर ACB ची कारवाई…

 

जळगाव समाचार डेस्क;

वाळू माफियांमुळे आधीच नद्यांना पोखरून पोखरून नदीपात्रात अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी अनेकवेळा मोहिमेवर गेलेल्या पोलिसांवर किंवा अधिकाऱ्यांवर माफिंयांकडून हल्लेही होतात. अश्यातच जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव पोलीस ठाण्यातील हवालदाराला वाळू व्यावसायिकाकडून कडून ५० हजारांची लाच (Bribe) घेतांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. यामुळे अन्य भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणार्या अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव पोलीस ठाण्यातील आरोपी हवालदार किरण रविंद्र पाटील (४१) यांनी तालुक्यातील २८ वर्षीय वाळू व्यावसायिकाला सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न व्हावी यासाठी २ लाख ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान तक्रारदार वाळू व्यावसायिकाने याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
त्यानुसार कारवाई करत तक्रारीची गुरुवार दि.२५ जुलै रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता हवालदार किरण पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे २ लाख ६० हजाराची मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष ५० हजार रुपये लाच रक्कम देण्याचे ठरले. शुक्रवार दि.२६ रोजी किरण पाटील यास लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी भडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
यांनी केली कारवाई…
संपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने ही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here