जळगाव समाचार डेस्क| २१ जानेवारी २०२५
विशाखापट्टणम् येथील एसथ्री स्पोर्ट्स एरिना येथे 17 ते 19 जानेवारीदरम्यान आयोजित डेक्कन प्रीमियर कॅरम लीग सीझन-3 मध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या जैन सुप्रिमोज संघाने पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी स्ट्राइकफोर्स संघाला ३-२ असा पराभव करून चषक आपल्या नावे केला.
स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून आठ संघांचा सहभाग होता. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत १६५ सामने खेळविण्यात आले. जैन सुप्रिमोज संघाने उत्कृष्ठ संघभावना व कौशल्य दाखवत अंतिम विजय मिळवला. विजेत्यांना रोख पारितोषिक आणि मोठा चषक देऊन गौरविण्यात आले.
जैन सुप्रिमोज संघामध्ये कर्णधार संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, गौतम भोई, कु. एम. एस. के. हरिका, झैयद अहमद, नईम अन्यारी, रहिम खान आणि व्यवस्थापक सय्यद मोहसीन यांचा समावेश होता. संघाने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी करताना स्पर्धेत बाजी मारली.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात डेक्कन प्रीमियर कॅरम लीगचे अध्यक्ष डॉ. नीरज कुमार संपथी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांनी विजेत्यांचा सत्कार केला. यामध्ये आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस व्ही. डी. नारायण, ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस भारती नारायण आणि आंध्रप्रदेश राज्य कॅरम असोसिएशनचे सरचिटणीस एस. के. अब्दुल जलील यांनी मुख्य पंच म्हणून भूमिका बजावली.
स्पर्धेत जैन सुप्रिमोज संघाने प्रथम, स्ट्राइकफोर्सने दुसरे तर नव्याभारती स्ट्रायकर्सने तिसरे स्थान मिळवले. चार्मी-नार चॅलेंजर्स चौथ्या क्रमांकावर राहिले.
जैन सुप्रिमोज संघाच्या विजयानंतर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक आणि संघमालक अतुल जैन तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे व रविंद्र धर्माधिकारी यांनी विजेत्या संघाचे कौतुक केले.