IPL 2025: अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार…

जळगाव समाचार | ३ मार्च २०२५

आयपीएल 2025 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचे नेतृत्व अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे करणार आहे. शाहरुख खानच्या मालकीच्या या संघाने त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

गेल्या हंगामात KKR ला चॅम्पियन बनवणारा श्रेयस अय्यर संघातून बाहेर पडल्यामुळे नव्या कर्णधाराबाबत चर्चा रंगली होती. सुरुवातीला संघातील सर्वात महागडा खेळाडू व्यंकटेश अय्यर कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, अखेर अजिंक्य रहाणेवर विश्वास दाखवत KKR ने त्याला कर्णधार बनवले, तर व्यंकटेश अय्यरला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अजिंक्य रहाणे प्रथम अनसोल्ड राहिला होता. मात्र, नंतर KKR ने त्याला 1.5 कोटींच्या मूळ किंमतीत खरेदी केले. लिलावाच्या अखेरच्या टप्प्यात कोलकाताने रहाणेवर विश्वास दाखवल्याची संकेत आधीच मिळाले होते.

अजिंक्य रहाणे हा अनुभवी कर्णधार आहे. भारतीय संघासाठी त्याने नेतृत्व करताना महत्त्वाचे विजय मिळवले आहेत. 2021 मध्ये विराट कोहली अनुपस्थित असताना त्याने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवून दिला होता. तसेच, देशांतर्गत रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका होती.

या अनुभवामुळेच कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर विश्वास ठेवत कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. आता IPL 2025 मध्ये तो संघाला कसा पुढे नेतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here