Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रविवाह सोहळ्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश: सुलतानपूर गावाची अनोखी परंपरा…

विवाह सोहळ्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश: सुलतानपूर गावाची अनोखी परंपरा…

 

जळगाव समाचार डेस्क | २६ नोव्हेंबर २०२४

शहादा तालुक्यातील सुलतानपूर हे साधारण तीन हजार लोकवस्तीचे गाव पर्यावरणपूरक संस्कृतीसाठी ओळखले जाते. मागील दहा वर्षांपासून येथे एक अनोखी परंपरा सुरू आहे, ज्यामध्ये गावातील मुलगी विवाहासाठी जाताना वऱ्हाडासोबत जाण्यापूर्वी गावात वृक्षारोपण करते. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याबरोबरच, आपली आठवण कायमस्वरूपी झाडाच्या स्वरूपात गावात राहील, याची हमी दिली जाते.

अशाच पद्धतीने सुलतानपूर येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या कंचन पाटील हिच्या विवाह सोहळ्यातही ही परंपरा जपली गेली. लग्नासाठी वऱ्हाड रवाना होण्यापूर्वी कंचन हिने गावात झाड लावले. या कार्यक्रमाला युवराज पवार, राहुल शिंदे, गणेश पाटील, विनोद पाटील, दिनेश पाटील, विनोद मोरे व गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे ग्रामस्थांनीही भरभरून कौतुक केले.

विवाह सोहळा म्हणजे आनंदाचा क्षण, परंतु तो पर्यावरणाच्या संवर्धनाशी जोडण्याचा हा आगळावेगळा विचार आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत आहे. वृक्षारोपणाची परंपरा जपताना गावातील नागरिक निसर्ग संतुलन जपण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

वृक्षतोड आणि अपुऱ्या प्रमाणातील वृक्षलागवड यामुळे वातावरणीय बदल होत आहेत, पावसाचे प्रमाण कमी होत आहे, आणि निसर्गाचा समतोल बिघडत आहे. सुलतानपूर ग्रामस्थांनी याची जाणीव ठेवत लग्नसोहळ्याला सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाशी जोडले आहे. ही झाडे गावाची ओळख बनली असून, इतर गावांनाही प्रेरणा देत आहेत.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page