जळगाव समाचार | २० डिसेंबर २०२५
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ यंदा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. येत्या ७ फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून, अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा जेतेपदावर आपले नाव कोरले होते. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. दरम्यान, शनिवारी (२० डिसेंबर) बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली.
जाहीर करण्यात आलेल्या संघात यंदा अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. खराब फॉर्म आणि दुखापतीच्या पार्श्वभूमीवर शुबमन गिलला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संजू सॅमसनला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीमुळे रिंकू सिंगचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दमदार फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडणाऱ्या इशान किशनला दुसरा यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघाचा भाग असलेल्या जितेश शर्माला या वेळी वगळण्यात आले आहे.
या स्पर्धेत भारतीय संघ ‘अ’ गटात असून पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड आणि नामिबिया हे संघ त्याच गटात आहेत. भारत आपला पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध मुंबई येथे खेळणार आहे. त्यानंतर १२ फेब्रुवारीला नामिबिया (दिल्ली), १५ फेब्रुवारीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध (कोलंबो) आणि १८ फेब्रुवारीला नेदरलँडविरुद्ध (अहमदाबाद) सामना होणार आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय संघ असा आहे : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि इशान किशन (यष्टीरक्षक).

![]()




